ध्वनी संदेशाने वाचविले १५,५०० रुपये- शेतकरी यशोगाथा
सुधाकर जगन टेंभूर्णे (५९) हे गाव विरसी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथील रहिवाशी आहेत. त्यांचेकडे एकूण पाच एकर जमीन असून ते या जमिनीत खरीपात धान आणि रबी हंगामात गहू पीक घेतात. त्यांना वर्षभरापासून रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा (आरएफ-आयएस) चा ध्वनी संदेश (व्हीएमएस) नियमित येतो आणि त्यामधून त्यांना शेतीचे तंत्रज्ञान आणि हवामानविषयक माहिती मिळते.
सन २०१९-२० च्या रबी हंगामाचे शेवटी त्यांनी त्यांच्या शेतातील गव्हाची कापणी करून ढीग घातला होता. त्याच वेळी, त्यांना आरएफ-आयएस कडून ध्वनी संदेश प्राप्त झाला. येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित आणि झाकून ठेवण्यास या संदेशात सांगितले होते. त्यानुसार कापणी केलेला ढीग त्यांनी लगेच ताडपत्रीने व्यवस्थित झाकून घेतला.
त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेल्या ध्वनी संदेशानुसार हवामानाच्या अंदाजाविषयी बहुतेक अंदाज खरे ठरले होते. संदेशात सांगितलेल्या अंदाजानुसार खरोखरच मुसळधार पाऊस झाला. पावसानंतर त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी गव्हाची मळणी केली व त्यातून त्यांना चांगल्या प्रतीचा १० क्विंटल गहू झाला. तो त्यांनी सरासरी रु. २,१०० प्रति क्विंटल प्रमाणे रु. २१,००० ला विकला. कापणी केलेला शेतमाल त्यांनी वेळीच झाकला नसता तर त्यांचा ३० टक्के माल वाया गेला असता आणि उर्वरित ७ क्विंटल गव्हाची प्रत खराब झाली असती.
अशा खराब गव्हाला रु १,५०० पर्यंतच भाव मिळून त्यांना फक्त रु. १०,५०० एवढीच रक्कम मिळाली असती. याशिवाय रु. ५,००० किमतीचा गव्हांडा सुद्धा त्यांना सुस्थितीत ठेवता आला. अश्या तऱ्हेने आरएफ-आयएस च्या एका ध्वनी संदेशामुळे त्यांचा रु.१५,५०० चा फायदा झाला.
“रिलायन्स फाऊंडेशनकडून अगदी योग्य वेळी मिळालेल्या ध्वनी संदेशामुळे मला त्वरित निर्णय घेवून माझा कापणी केलेला गहू लगेच झाकून घेता आला. संदेश मिळाला नसता तर मेहनतीने कमावलेला माल खराब होवून माझे मोठे नुकसान झाले असते.”- सुधाकर जगन टेंभूर्णे