साधू और शैतान : वीरेंद्र कडू यांचा विशेष लेख

साधू और शैतान

----------------
संक्षिप्त ■ पालघर घटनेत मारणारे आणि मरणारे एकाच धर्माचे अन् जातीजमातीचे लोक होते. त्यामुळे घटनेला धार्मिक रंग देणार्या अमानुष प्रवृत्तीला आपोआपच खीळ ठोकल्या गेली आहे. असे असून सुद्धा देशातील काही धर्मांध सैतानी प्रवृत्ती मेलेल्या निरपराध साधुंच्या टाळुवरचं लोणी खाण्यासाठी गिधाडासारखी टपून बसलेली आहेत. भगव्या, निळ्या, हिरव्या, अशा विविध रंगात दडून बसलेल्या या विषाणुंचा प्रादुर्भाव समाजातील शांतता भंग करणारा आहे. धर्मांधाने पछाडलेल्या ह्या प्रवृत्ती सदर घटनेला धार्मिक रंग देण्याचे अनिष्ट काम करीत आहे. यावर शासनाने वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. समाजातील सलोखा टीकविण्यासाठी अशा प्रवृत्ती भारतीय समाजाला बाधक ठरत आहे. 
----------------

          साधू और शैतान हा लेख पालघरच्या साधू हत्याकांडावर आधारीत आहे. जागतिक कोरोना संकटकाळात पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात घडलेल्या या भीषण हत्याकांडाचा मागोवा घेतांना घटनेचे वास्तव, गुन्हेगार, पोलीस प्रशासन, राज्यशासन आणि देशासह जगात उमटलेले घटनेचे पडसाद अशी इत्यंभूत माहिती विवेचनात्मक स्वरुपात लेखात मांडलेली आहे. परंतु घटनेपर्यंत पोहचण्याधी घटनेशी संबंधीत काही शब्दांचे प्रारंभी विवेचन देण्यात आले आहे. त्यामुळे घटनेला चिकटलेले सांस्कृतिक सामाजिक अन् धार्मिक संदर्भ कसोटीवर खरे उतरतील असा विश्वास आहे. कालपरत्वे शब्दांचे मूळ संदर्भ हल्ली वर्तमान काळात बदलत चालले आहे. देशासाठी ही धोक्याची घंटा आहे.

          पालघर हत्याकांडाला धार्मिक रंग चढतांना बघून काही शब्दांचे विवेचनात्मक स्वरुप स्पष्ट करणे गरजेचे आहे. साधु: हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सिद्धपुरुष होतो! समानार्थाने त्याला सज्जन, वैरागी, संन्याशी, तपस्वी, योगी, महात्मा, संत अशी विशेषणे आहेतच. याच अर्थाने त्या कक्षेतील महिलांना साध्वी म्हटल्या जाते. साधू या तत्सम शब्दाचा साध हा धातू आहे. इच्छा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे साधना करुन लोकांची इच्छापूर्ती करणारा सिद्धपुरुष म्हणजे साधू! साध्य, साधक, साधित, साधणें, साधना, सिद्ध सिद्धी सिद्धता आणि सिद्धांत हे सर्व शब्द साधु: कुटुंबातीलच आहे. साधना करुन मिळविलेले ते सर्व साधित या अर्थाने साधुंचे वचन म्हणजे सिद्धांत! जो सामान्यतः जीवन जगण्याचा उत्तम मार्ग असतो.

          भगवान गोतम बुद्ध, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकोबाराय, चक्रधर स्वामी, संत कबीर, पेरियार स्वामी, कर्मयोगी गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासह महात्मा बसवेश्वर, तीर्थकर महावीर, महात्मा जोतिबा व महात्मा गांधी अशा साधू कक्षेत मोडणार्या सिद्धपुरुषांनी समाजाला उन्नतीचा कल्याणकारी उत्तम मार्ग दाखविला आहे. परंतु अलिकडे या मूळ सिद्धपुरुषांच्या वेषात काही सैतान देशात लपून बसलेले आहेत. वेषांतर करुन समाजाला भुलवत आहे. सिद्धपुरुषांच्या नावाखाली त्यांनी आपला गोरखधंदा चालविला आहे. अशा ढोंगी साधुंच्या मुसक्या आवळून शासनाने त्यांच्या सैतानी साधुगिरीला आळा घालणे गरजचे आहे.

          वर्तमान काळात या ढोंगी साधुंनी देशाच्या वातावरणाला इतके प्रदुषित करून ठेवले आहे की लोक खर्या साधुंवर सुद्धा शंका घेऊ लागले आहेत. कारण की कोण खरा आणि कोण ढोंगी? यातला फरक अजूनही समाजाला कळलेला नाही. त्यामुळे साधूंना ओळखणे कठीण झाले आहे. तत्त्ववेत्यांच्या मते खर्या साधुला ओळखण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला हा की खरा साधु आपल्या जेष्ठ सिद्धपुरुषाशिवाय कुणालाही नमस्कार करुन हात जोडत नाही. दुसरा असा की खरा साधू चमत्कार दाखवून समाजाला कधीही भ्रमीत करीत नाही आणि तिसरा मार्ग म्हणजे खरा साधु दमस्कार म्हणजे धनसंपत्तीची आसक्ती ठेवत नाही. नमस्कार, चमत्कार आणि दमस्कार या तीन कसोट्यांवर खरा उतरणारा योगीपुरुष म्हणजे साधू! अन् या तत्त्वाच्या विरोधात असणारा सैतान!
          पालघर मध्ये घडलेल्या साधु हत्याकांडात तेथील लोकांना याच ढोंगी साधुंच्या वृत्तीने पछाडलेले होते. साधुच्या वेषात मुले चोरणारी टोळी परिसरात फिरत आहे. अशी अफवा असल्याने खर्याखुर्या दोन सज्जन साधुंची तेथे हत्या झाली. सदर घटनेमागे देशातील ढोंगी साधुगिरीचे वातावरण नेटाने त्याला कारणीभूत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. महाराष्ट्र शासनाने आणि समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर उगीच कोण भले अशा भल्या साधु लोकांची हत्या करणार? साधुगिरीचे ढोंग माजविणार्या अशा शैतानी प्रवृत्तीमुळेच आज स्वामी कल्पवृक्ष योगी व स्वामी सुशील गिरी या योगीरत्नांची पालघर येथे हत्या झालेली आहे. म्हणूनच वरील संदर्भ घटनेच्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरतात. 

          माॅब लिचिंगच्या घटना देशात पूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. परंतु कोरोनाच्या जीवघेण्या भयंकर काळात ही घटना घडणे फारच दुर्दैवी म्हणावे लागेल. एकीकडे कोरोनामुळे माणसं कुत्र्यामांजरा सारखी मरुन पडत आहे अन् दुसरीकडे अंत्यसंस्काराला जाणारी ही साधू माणसं लोकांकडून मारल्या जात आहे. मनाला अगदीच सुन्न करुन सोडणारी ही घटना आहे. त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांचेवर अमानुषपणे लाठ्या-काठ्या आणि दगडांचा हल्ला करणारी ही माणसं, माणसंच होती की सैतान? असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधूचा तो केविलवाणा चेहरा बघून आजही हृदय सारखं पिळून निघत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.  

अशी झाली साधुंची हत्या


          कोरोनामुळे संपूर्ण राज्यात कर्फ्यू आणि जिल्हाबंदी असतांना पालघर जिल्ह्यात अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या गडचिंचोले गावात घडलेली ही विदारक घटना आहे. सदर गाव म्हणजे आदिवासींचा पाडा आहे. या गावापासून २० किलोमीटर अंतरावर दादरा नगर-हवेली हा गुजरात मधील केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशाची हद्द गडचिंचोले गावापासून सुरु होते. मुंबई ते पालघर १२० किलोमीटरचे अंतर आहे. पालघर पासून दादरा नगर-हवेली ११० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच पालघर ते गडचिंचले ९० किलोमीटर अंतरावर आहेत. ३५ किलोमीटर अंतरावर हद्दीतील कासा पोलीसस्टेशन आहे. 

         मुंबई येथील कांदिवली भागात राहणारे हनुमान मंदिरातील दोन साधू अनुक्रमे स्वामी कल्पवृक्ष गिरी व स्वामी सुशील गिरी लाॅकडाऊन मुळे एका खासगी इको गाडीने मुंबईहून गुजरात मधील सिल्वासा येथे एका अंत्यविधीला निघाले होते. पालघर ओलांडल्यानंतर दादरा नगर-हवेलीच्या सीमेजवळ पोलिसांनी त्यांना अडविले व परत पालघर कडे पाठविले. कर्फ्यू चालू असल्यामुळे हायवेने पुन्हा परत जाणे योग्य ठरणार नाही म्हणून साधुंनी दाभाडी-खानवेल या आडमार्गाने परत जाण्याचे ठरविले. रात्री ११.३० सुमारास अत्यंत दुर्गम परीसरात वसलेल्या गडचिंचले गावातून जातांना वनविभागाच्या चौकशी नाक्याजवळ जमावाने त्यांची गाडी अडविली. 

          लाठ्या-काठ्या घेवून असलेल्या चार-पाचशे लोकांचा जमाव पाहून साधुंनी गाडीच्या काचा खाली केल्या नाहीत. जमावाने विचारपूस न करता लाठ्या-काठ्या आणि दगडांनी त्यांची गाडी तोडफोड करायला सुरवात केली. वनविभागाच्या वाॅचमनने पोलिसांना व सरपंचाला घटनेची माहिती दिली. सरपंच चित्रा चौधरी यांनी पोलीस येईपर्यंत चारशे-पाचशे लोकांच्या जमावाला रोखून धरण्याचे काम केले. कासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सुधीर कटारे यांनी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले. जमावाला शांत करुन साधुंना सरंक्षण देण्याचा प्रयत्न केला.

          घटनास्थळी कटारे सोबत आलेल्या काॅन्स्टेबल साळुंखेने साधुंना धीर देत जमावाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने साधु स्वामी सुशील गिरी व ड्रायव्हर नीलेश तेलगडे त्यांच्या इको गाडीतून बाहेर निघून पोलिस व्हॅनमध्ये जाऊन बसले. दुसरा साधू स्वामी कल्पवृक्ष गिरी थोडा वयस्क आणि थकलेला होता. तो गाडीतून शेवटी उतरतांना जमावातून कुणीतरी मारलेल्या दगडाने रक्तबंबाळ झाला. पोलीस व्हॅनपर्यंत पोहचू शकला नाही. जीव वाचविण्यासाठी कसाबसा साळुंखे पोलीसासह तो चेक नाक्याच्या चौकीत जीव मुठीत धरुन लपला. सरपंच चित्रा चौधरी याच चौकीच्या मागच्या दाराने भयभीत होऊन पळून गेली होती. 

          स्थितीचे गांभीर्य ओळखून कटारे आणि साळुंखे यांनी साधुला पोलिस व्हॅनमध्ये बसविण्यासाठी मोठ्या हिंमतीने हात धरुन चौकीबाहेर आणले. अंतरावर असलेल्या पोलीस व्हॅनकडे जातांना जमावाच्या लाठ्याकाठ्या आणि दगडांपुढे साधू कल्पवृक्ष गिरी आपला जीव वाचवू शकला नाही. कटारे आणि साळुंखे पोलिसांचा प्रयत्न निष्प्रभ ठरला. कटारे यांना वरिष्ठ असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद काळे सुद्धा एका पोलिस काॅन्स्टेबलला सोबत घेवून घटनास्थळी पोहचले होते. परंतु जमावाच्या आक्रमकते पुढे चारही पोलीस अधिकारी हतबल झाले. पोलीस व्हॅनमध्ये बसलेला दुसरा साधू स्वामी सुशील गिरीला आणि ड्रायव्हर नीलेश तेलगडेला सुद्धा नंतर जमावाने अमानुषपणे ठार मारले.

          गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले डहाणू तालुक्यातील हे गावं महाराष्ट्र राज्यातच आहे. परंतु महाराष्ट्रातून गावात शिरण्यासाठी मार्ग नाही. दादरा नगर-हवेली ओलांडूनच गावात जावं लागते हे विशेष! या गावात अनुसुचित जमातीचे एकूण २४८ कुटुंब राहतात. गावच्या सरपंच भाजपच्या चित्रा चौधरी असून या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. विधानसभा मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाच्या विनोद निकोले यांच्या ताब्यात असून ते डहाणू विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांचेकडे आहे. अशी या मतदार संघाची राजकीय स्थिती असून गडचिंचले गावात एकही मुसलमान नाही. 

          सदर घटनेत मारणारे आणि मरणारे एकाच धर्माचे अन् जातीजमातीचे लोक होते. त्यामुळे घटनेला धार्मिक रंग देणार्या अमानुष प्रवृत्तीला आपोआपच खीळ ठोकल्या गेली आहे. असे असून सुद्धा देशातील काही धर्मांध सैतानी प्रवृत्ती मेलेल्या निरपराध साधुंच्या टाळुवरचं लोणी खाण्यासाठी गिधाडासारखी टपून बसलेली आहेत. भगव्या, निळ्या, हिरव्या, अशा विविध रंगात दडून बसलेल्या या विषाणुंचा प्रादुर्भाव समाजातील शांतता भंग करणारा आहे. धर्मांधाने पछाडलेल्या ह्या प्रवृत्ती सदर घटनेला धार्मिक रंग देण्याचे अनिष्ट काम करीत आहे. यावर शासनाने वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. समाजातील सलोखा टीकविण्यासाठी अशा प्रवृत्ती भारतीय समाजाला बाधक ठरत आहे. 

          राज्यात माॅब लिचिंगची ही काही पहिलीच घटना नाही. फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा धुळे येथे अशीच माॅब लिचिंगची घटना घडली होती. पाच भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना जमावाने दगडांनी ठेचून मारले होते. सरकारी वकील उज्ज्वल निकम अजूनही त्या केसचे काम पाहत आहे. साधुंचे हत्याकांड घडण्यापूर्वी अगदी दोन दिवस आधी १४ एप्रिलला याच परिसरातील डाॅ. विश्वास वळवी यांचेवर सारडी गावात असाच दोनशे अडीचशे लोकांनी हल्ला केला होता. डाॅ वळवी सोबत तेव्हा जिल्हा परिषद सदस्य जयंत दुबला घटनास्थळी हजर होते. त्यांनी तुरंत कासा पोलीस स्टेशनला संपर्क केला. तेव्हा सुधीर कटारे व आनंद काळे हेच दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. त्यांच्यामुळे डाॅ. वळवींचे प्राण वाचले होते. तेव्हा सुद्धा पोलिसांवर दगडफेक झाली होती. त्यामुळे येथील पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

          पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. कैलास शिंदे यांनी राज्य शासनाला दिलेल्या माहिती नुसार गडचिंचोले परिसरात साधुंच्या वेषात मुले पळविणारी टोळी शिरल्याच्या अफवेने तेथील लोक पछाडलेले होते. लोकांनी एकत्रित पहारा देण्याचा निर्णय घेतला. अशात त्यांना १६ एप्रिलच्या रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी- खानवेल मार्गावरुन जातांना दिसली. गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. वनविभागाच्या चेक नाक्याजवळ जमावाने त्यांची गाडी अडवली. विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर काठ्या-लाठ्यांनी हल्ला चढविला. त्यात निरपराध तीन लोकांचा जीव गेला. सदर बातमी कळताच रात्री दीडच्या सुमारास मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहचला पण तोपर्यंत तिघांची हत्या झाली होती. सदर घटना धार्मिक तत्त्वाशी जुळलेली नसून केवळ गैरसमजातून घडलेली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

          जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले खरे पण जगाला हादरुन सोडणार्या या अमानुष घटनेमुळे त्यांच्या जिल्हापोलिस प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह लागलेले आहे. राज्य शासनाने सदर घटनेची चौकशी आता सी.आय.डी कडे सोपविली आहे. चार ड्रोन कॅमेरे लावून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने १७ एप्रिलला लहान मोठ्या अशा १०१ आरोपींना ताब्यात घेतले आहे. डहाणू न्यायालयाने त्यांना हल्ली ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील ९ आरोपी १८ वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. जिल्हाच्या शल्य चिकित्सक डाॅ. कांचन वानोरे यांनी सुद्धा सदर घटनेबाबत थोडक्यात माहिती दिली आहे. 

          साधुंना मारणारे हात ताब्यात आलेत. परंतु त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देणारे हात कुणाचे होते? त्यांना गुन्ह्याकडे वळविणारे डोके कुणाचे होते? कोण लोक आहेत ज्यांनी परिसरात मुले पळविणारी साधुंची टोळी फिरत असल्याची खोटी अफवा पसरविली? याचा शोध घेतल्या शिवाय खर्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे कठीण आहे. घटनेच्या संदर्भात काही प्रश्न अजूनही लोकांच्या मनात आहेत. राज्यात लाॅकडाऊन सुरु असतांना आणि जिल्हाबंदी असतांना साधू मुंबईवरून पालघर जिल्ह्यात पोहचले कसे? पालघरलाच त्यांचे वाहन जप्त का करण्यात आले नाही? पोलिसांना चुकवून ते केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेपर्यंत कसे पोहचले? डाॅ. वळवींच्या घटनेचा ताजा अनुभव असतांना रात्री घटनास्थळी पुरेसा पोलीस फौजफाटा का पाठविण्यात आला नाही? ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 

          देशात मुले पळविणार्या टोळ्या सक्रीय आहेत. ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण त्याचे अनेक पुरावे आहेत. मुलांना पळवून त्यांच्या किडन्या विकण्याचा अमानवी गोरखधंदा राष्ट्रीयस्तरावर सुरु आहे. त्याचे व्हीडीओ सुद्धा देशात सर्वीकडे व्हायरल झाले आहे. मानवी जीवाचा असा अमानुष उद्योग करणार्या सैतानी टोळ्यांचा शोध घेवून पर्दाफाश करणे गरजेचे आहे. त्यांना फासावर लटकवून या अमानवी उद्योगाला खीळ ठोकल्या गेली पाहिजे. पालघर प्रकरणाला याच सैतानी साधुगिरीची पार्श्वभूमी आहे. हे दुर्लक्षित करता येणार नाही. साधुंच्या वेशात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेनेच निरपराध खर्या साधुंची हत्या करण्यात आली. त्यामुळे 'साधू और शैतान ओळखणे दुरापास्त झाले आहे.  

लेखक: वीरेंद्र कडू 
ई-मेल: virendrakadoo@gmail.com
मोबाईल क्रमांक: ९४०४२०२७४४
आर्वी जि. वर्धा  
Previous Post Next Post