दक्षतेचे नियम अनिवार्य करून विविध व्यवसायांना परवानगी
टप्प्याटप्यात इतर सुविधा सुरू करणार -जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 7 : राज्यातील अर्थचक्राला गती देण्याच्या हेतूने संचारबंदीच्या काळात काही प्रमाणात शिथीलता आणून जीवनावश्यक व अत्यावश्यक उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध दुकानांना परवानगी देण्यात येत आहे. दक्षतेचे नियम पालन अनिवार्य करून जिल्ह्यात इतरही सुविधा टप्प्याटप्प्यात सुरु करण्यात येतील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज दिल्या. ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी संयम, शिस्त व धैर्य राखण्याची गरज आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्कचा वापर खूप आवश्यक आहे. ही केवळ या काळापुरती दक्षता नसून, भविष्यातही ही सवय अंगी बाणवावी लागेल. जिल्ह्यात विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. टप्प्या टप्याने इतरही व्यवसाय सुरू करण्यात येतील. तथापि, या काळात नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
लॉकडाऊनच्या कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडून प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार सीलबंद मद्यविक्री करताना दक्षतेबाबतच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांना देण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षकांना दिले आहेत. प्रथम ग्रामीण भागात व नंतर शहरात अशा टप्प्याटप्प्याने सुरक्षितता व इतर बाबी तपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे ते म्हणाले.