नवरदेव-नवरीव्यतिरिक्त चौघांनाच उपस्थित राहता येणार

नवरदेव-नवरीव्यतिरिक्त चौघांनाच उपस्थित राहता येणार

नवरदेव-नवरीव्यतिरिक्त चौघांनाच उपस्थित राहता येणार

लग्न समारंभासाठी पूर्व परवानगीचे अधिकार पोलीसांना


अमरावती : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांत गर्दी टाळण्यासाठी विवाहसमारंभातील उपस्थितीवरही मर्यादा घालण्यात आली असून, नवरदेव व नवरी यांच्याव्यतिरिक्त केवळ चौघांनाच समारंभात उपस्थित राहता येणार आहे.

कोरोना संसर्गाचे गांभीर्य पाहता लग्न साध्या व घरगुती पद्धतीने करण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.

लग्न समारंभासाठी परवानगी देण्यासाठी  पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात पोलीस आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हे त्यांच्या अधिनस्त असलेल्या ठाणेदार, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे अधिका-यांना आपले याबाबतचे अधिकार प्रदान करू शकतील. इतर ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. 

लग्नाकरिता फक्त एकाच वाहनाला परवानगी देण्यात येणार असून वाहन निर्जंतुक करणे असणे आवश्यक आहे. लग्नसमारंभास परवानगी देताना परवानगी अधिका-याने लग्नाकरिता मागणी केलेल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक परवानगी पत्रावर नोंद करणे आवश्यक आहे. लग्नास उपस्थित राहणाऱ्या सर्वांकडे वैद्यकीय तपासणी  प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.  कोविड 19 ची कोणतीही लक्षणे नसल्याबाबत नोंदणीकृत खासगी किंवा शासकीय वैद्यकीय व्यावसायिकाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. क्लस्टर आणि कंटेनमेंट झोनमधील व्यक्ती असल्यास तिला लग्न समारंभासाठी उपस्थित राहता येणार नाही.

लग्न समारंभ पार पडताना सर्वांनी सामाजिक अंतर पालन करावे, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, ग्लोव्हज्, सॅनिटायझर व इतर प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे, तसेच लग्न समारंभात उपस्थित राहणाऱ्या सर्वांना आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक आहे.  अमरावती जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात लग्नासाठी जायचे असल्यास किंवा अमरावती जिल्ह्यात यायचे असल्यास त्या त्या जिल्ह्यातील प्राधिकृत अधिका-यांची प्रवास व वाहनाबाबतची परवानगी घेणे आवश्यक राहील.

लग्न समारंभ ज्या ठिकाणी आयोजित केला आहे, तेथील संबंधित पोलीस ठाण्यास, त्याचप्रमाणे संबंधित वर-वधू यांच्या गावांतील ग्रामपंचायतींनाही कळविण्यात यावे, असे आदेश आहेत.
Previous Post Next Post