कापूस खरेदीला येणार वेग, जीनांची संख्या वाढवली

कापूस खरेदीला वेग येण्यासाठी संबंधित यंत्रणेला दिले निर्देश

कापूस खरेदीला येणार वेग, जीनांची संख्या वाढवली 


अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीला वेग येण्यासाठी आज पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. कापूस खरेदीला वेग देण्यासाठी ८ खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढवली असून त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 10 कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. मागच्या आठवड्यापासून त्यांना फिल्डवर नेमण्यात आले आहे. त्यामुळे सात आणखी जीन सुरु होऊ शकल्या. 

जीन ची संख्या वाढविल्याने कापूस खरेदीला वेग येत आहे. आतापर्यंत २२ हजार २०४ शेतक-यांची सुमारे सव्वासहा लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.

कापूस खरेदी १५ जूनपूर्वी पूर्ण झाली पाहिजे

दिवसभरात केंद्रावर येणा-या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कापूस खरेदी १५ जूनपूर्वी पूर्ण झाली पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करावा. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे.  कोरोना संकटकाळ लक्षात घेता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मात्र, त्याशिवाय ही कामे पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीत, हे लक्षात ठेवून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

कापसाचा हमीभाव ५  हजार ५०० रूपये

जिल्ह्यात एकूण ८ कापूस खरेदी केंद्रे आहेत. त्यातील एक CCI चे असून, ते धामणगाव रेल्वे येथे आहे. उर्वरित खरेदी केंद्रे पणन महासंघाची आहेत. कापसाचा हमीभाव ५  हजार ५०० रूपये आहे.  कापूस खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, दक्षता पाळताना कामाच्या वेगही कायम ठेवावा लागेल. सर्वांची सुरक्षितता जपून प्रत्येक कार्यवाही करावी, कुठल्याही अडचणी आल्या तर  तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश देण्यात आले आहे. 
Previous Post Next Post