अमरावतीत सोमवारपासून घरपोच मद्यविक्री सेवेला परवानगी



अमरावतीत सोमवारपासून घरपोच मद्यविक्री सेवेला परवानगी

अमरावती, दि. 16 : अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन व त्यापासून 200 मीटर परिसरातील मद्यविक्री दुकाने वगळून उर्वरित मद्यविक्री दुकानांना 18 मेपासून घरपोच मद्यविक्री सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानातून घरपोच मद्य पुरविण्याचा कालावधी सकाळी 10 ते दुपारी 4 असेल.

तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे. त्यानुसार कंटेनमेंट झोन व लगतचा 200 मीटर वगळून इतर ठिकाणच्या एफएल-2, एफएलीबीआर-2 या दुकानांना मागणी नोंदवून त्यानुसार सेवा पुरवता येईल. देशी मद्य घरपोच पुरविण्यास मनाई करण्यात आली आहे.  घरपोच मद्यविक्री सेवा ही केवळ वैध परवानाधारकास देता येईल. ग्राहकाकडे परवाना नसल्यास दुकानदाराकडून नमुना एफएलएक्ससी परवाना दिला जाईल किंवा https://stateexcise.maharashtra.gov.in किंवा https://exciseservices.mahaonline.gov.in वर उपलब्ध आहे.

मद्याची मागणी नोंदविण्यासाठी परवानाधारक ग्राहक व्हाटस ॲप, एसएमएस, मोबाईल, फोनचा वापर करू शकेल. किरकोळ मद्यविक्री करणा-या दुकानदाराने उपलब्ध माध्यमांचा वापर करून घरपोच सुविधा देण्याची कार्यवाही करावी. मद्याची ने-आण करणा-या व्यक्तीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक किंवा दुय्यम निरीक्षकांकडून ओळखपत्र देण्यात येईल. वितरण व्यवस्थेसाठी दुकानदाराला मनुष्यबळ ठेवता येईल, मात्र त्यांची संख्या 10 हून अधिक असू नये. ओळखपत्रधारक व्यक्तीने एकावेळी ग्राहक व ग्राहकाच्या मागणीपेक्षा अधिक मद्य वाहतूक करू नये. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत 24 युनिटपेक्षा अधिक मद्याची वाहतूक करणार नाही. ई-कॉमर्समधील आस्थापनांना घरपोच मद्य पुरविता येणार नाही.

दुकानातून घरपोच मद्य पुरविण्याचा कालावधी सकाळी 10 ते दुपारी 4 असेल. कुठल्याही परिस्थितीत डिलिव्हरी बॉयला दुपारी 4 नंतर मद्य विकता येणार नाही. मद्य घरपोच पुरवल्यावर त्याचा पुरावा परवानाधारकाकडून घ्यावा. दुकानदाराने घरपोच सेवा देताना एमआरपीहून (कमाल किरकोळ किंमत) अधिक दर आकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

डिलिव्हरी बॉयची नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकाकडून तपासणी, मास्क, हेड कॅप, हँड ग्लोव्हज बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानदाराने सदर कामगारांचे वेळोवेळी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे. घरपोच व्यवहारांची स्वतंत्र नोंदवही ठेवावी व आदेशाचे काटेकोर पालन करावे, असेही आदेशित करण्यात आले आहे.
Previous Post Next Post