क्वारंटाईन नियम मोडणाऱ्या १३ व्यक्तिंवर कारवाई ५८ हजार रुपये दंड वसूल
प्रतिनिधी राजेश सोळंके :
वर्धा : राज्याच्या इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून गृह विलागीकरण (क्वारंटाईन) करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक गृह विलगिकरणाचे आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर पडून दैनंदिन व्यवहार करीत असल्याचे लक्षात आल्यावर जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा तालुक्यात प्रशासनाकडून १३ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यासोबतच 58 हजार रुपये दंड वसूल करण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण इतर जिल्ह्यातून परत येणाऱ्या नागरिकांमुळे वाढत असल्याचे दिसून येत आहे. ८ मे पर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने आणखी दक्ष राहून कारवाई करण्यास सुरुवात केली.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसोबतच त्यांचे पूर्ण कुटुंबाला गृह विलागीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात 36 हजार पेक्षा जास्त नागरिक आले आहेत. मात्र ५ मे नंतर आलेल्या नागरिकांमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गृह विलगिकरणातील नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा धोका वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांवर 10 हजार रुपये दंड आकारण्याचे आदेशीत केले. सोबतच गृह विलगिकरणातील नागरिकांच्या घरी आमदार ,खासदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी स्वतः भेट देऊन घरातच राहून कोरोना योध्दा होण्याचे आवाहन केले. मात्र तरीही काही नागरिक सर्व नियम मोडून घराबाहेर पडत आहेत. यामुळे जिल्ह्यात संक्रमणाचा धोका वाढत असल्यामुळे प्रशासनाने आता सक्त कारवाई करणे सुरू केले आहे.
आर्वीतही गुन्हा दाखल
यामध्ये काल अकोला येथून आर्वी येथे आलेली एक महिला कोरोना बाधित निघाली. या महिलेसोबतच संपूर्ण कुटुंब गृह विलगीकरण करूनही घरातील पुरुष त्यांचे बेकरीचे दुकान चालवत होते. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा पार्श्वभूमीवर सदर कुटुंबातील ४ व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कुटुंबातील चारही व्यक्तीवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. त्याचबरोबर सावंगी मेघे येथील दाम्पत्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा तालुक्यात गृह विलगिकरणात असलेल्या १४ नागरिकांवर घराबाहेर फिरताना आढळून आल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात ९ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यापुढेही गृह विलगिकरणाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिला आहे.
नोडल अधिकार-यावर सुद्धा कारवाई
गृह विलगीकरणात असलेल्या कुटुंबांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंगी मेघे येथील कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती घराबाहेर पडून कोरोना संक्रमण वाढवत होते. या प्रकरणात या भागातील नोडल अधिकाऱयांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्हा परिषदेमधील या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.