उर्ध्व वर्धा सिंचन लाभधारकांना आवाहन - 31 जुलैपूर्वी करावा लागणार अर्ज



उर्ध्व वर्धा सिंचन लाभधारकांना आवाहन  

अमरावती, दि. 26 : उर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्पाच्या लाभधारक शेतक-यांनी खरीप पीकांच्या सिंचनासाठी नदी-नाल्यावरील, कालव्यावरील पाणी मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे घ्यायचे असल्यास 31 जुलैपूर्वी अर्ज शाखा कार्यालयांना सादर करण्याचे आवाहन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

त्यासाठी पाणी अर्ज नमुना सात अ, सात ब कोरे फॉर्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य मिळतील. खरीपासाठी एक जुलै ते 14 नोव्हेंबर या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत. लाभधारकांना थकबाकीपैकी एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रीम पाणीपट्टी भरावी लागेल. लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी पाणी अर्ज मंजूर करून घेऊनच पाणी वापर करावा.

कालव्याचे पाणी वाहून नेणारी शेतचारी व विहीरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. मंजुरीपेक्षा जादा वापर व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास पंचनामा करून दंड आकारण्यात येईल. पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा बंद करण्यात येईल.  

लाभधारकांनी वितरीकेचा दरवाजा अवेळी उघडल्यास पाण्याचा विसर्ग कमी होतो व त्यामुळे पीकांना पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे पीकांना पाणी द्यावे. लाभक्षेत्रात हंगामातील पाऊस, लाभधारकांची पाण्याची मागणी व कालव्याच्या तांत्रिक अडचणी आदी विचारात घेऊन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन राहील, असे कार्यकारी अभियंत्यांनी कळवले आहे.
Previous Post Next Post